Breaking News

मुधोजी महाविद्यालयात सॉक्रेटिस क्लबचे उद्घाटन

Socrates Club inaugurated at Mudhoji College

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ : मुधोजी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने सॉक्रेटिस क्लबचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त नव सह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालय, नसरापूर येथील प्रा. अनिकेत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या विषयावर उद्बोधक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते.

    प्रा. अनिकेत चव्हाण यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा विविधांगी आढावा घेतला. पीपीटीच्या माध्यमातून त्यांनी विषय विद्यार्थ्यांसमोर रंजक आणि प्रभावी पद्धतीने मांडला. भारतीय तत्त्वज्ञानाचा उगम वेद व उपनिषदांमध्ये असला, तरी त्याचबरोबर वेद-उपनिषदांना समांतर असलेल्या विविध विचारधारांचाही भारतभूमीत उदय झाला. यामध्ये जैन, बौद्ध आणि चार्वाक दर्शनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

    भारतीय तत्त्वज्ञान ही संकल्पना केवळ एका विशिष्ट दर्शनापुरती मर्यादित नसून भारतात उदयास आलेल्या विविध विचारधारांसाठी ती वापरली जाते. भारतीय दर्शनांमध्ये प्रामुख्याने नऊ दर्शनांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी या दर्शनांचा सखोल अभ्यास केल्यास त्यांच्या जीवनदृष्टीमध्ये निश्चितच सकारात्मक परिवर्तन होऊ शकते, असे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

    “भारतीय तत्त्वज्ञान हे प्रगल्भतेचे द्योतक आहे. तत्त्वज्ञान, अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आपले जीवन अधिक प्रगल्भ बनवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून प्राचीन काळातील तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांच्याशी संवाद साधण्यासारखा अनुभव घेता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. पी. एच. कदम म्हणाले की, अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची मानवी जीवनात आवश्यकता आहे. तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाला दिशा देणारे आणि उपकारक असल्याने विद्यार्थ्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. एन. के. रासकर यांनी करून दिला. कु. पायल अहिवळे व कु. स्नेहा कर्चे यांनी सूत्रसंचालन केले, तर कु. सुहानी मदने यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

No comments