Breaking News

विडणी परिसरात डीपी चोरीच्या घटनांची मालिका ; शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Series of DP theft incidents in Vidni area; An atmosphere of concern among farmers and citizens

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ५ ऑगस्ट २२०६ : फलटण तालुक्यातील विडणी व परिसरातील गावांमध्ये ट्रान्सफॉर्मर (डीपी) चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, जुलै २०२६ या एकाच महिन्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी, नागरिक आणि लघुउद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे वीजपुरवठा विस्कळीत होऊन शेती, पाणीपुरवठा आणि उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे.

    पहिली घटना मठाचीवाडी शेरवस्ती येथे घडली असून, १९ ते २० जुलैदरम्यान झालेल्या या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, वीज चोरी व विद्युत उपकरणात फेरफार केल्याचा आरोप आहे.

    दुसरी घटना झिरपवाडी येथे २२ ते २३ जुलैदरम्यान घडली. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२७४/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) (चोरी), कलम ३२४(४) (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान) तसेच विद्युत अधिनियम कलम १३६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    तिसरी घटना विडणी येथे २५ ते २६ जुलैदरम्यान घडली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४५५/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि विद्युत अधिनियम कलम १३६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    सतत घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे विडणी परिसरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी शेतीपंप बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

    दरम्यान, विशाल बाळकृष्ण शिंदे यांनी  पोलीस प्रशासनाने तातडीने आरोपींना अटक करून या गुन्ह्यांचा छडा लावावा, महावितरणने डीपींना सुरक्षा कवच व सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, रात्रीची गस्त वाढवावी तसेच प्रभावित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

    या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासन आणि महावितरणने संयुक्तपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

No comments