सातारा जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी ला वेग; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण
सातारा, दि. 6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३१ हजार ५५६ लाभार्थ्यांपैकी २५ हजार २५९ म्हणजे ८० टक्के शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ६ हजार २९७ म्हणजे २० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे, अशी माहिती उपजिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २७ हजार २८६ लाभार्थ्यांपैकी २२ हजार ३९८ (८२ टक्के) शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून ४ हजार ८८८ (१८ टक्के) लाभार्थ्यांची प्रक्रिया प्रलंबित आहे. तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमध्ये ४ हजार २७० लाभार्थ्यांपैकी २ हजार ८६१ (६७ टक्के) शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून १ हजार ४०९ (३३ टक्के) लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments