Breaking News

मूकबधिर विद्यालय फलटण १० वी परीक्षेचा निकाल १०० टक्के - १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Deaf and mute school Phaltan 10th exam result 100 percent - tradition of 100 percent results continues

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय फलटणचा यंदाच्या वर्षीही १०वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

    मूकबधिर विद्यालयांमध्ये ८ मुलांची एक तुकडी असते. यंदाच्या वर्षी विद्यालयातील ७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

    या यशामध्ये ५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत तर २ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. विशेष म्हणजे, हे विद्यालय अनुदानित अनिवासी स्वरूपाचे असले तरी गेल्या १५ वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून निवासी शाळाही यशस्वीपणे चालवली जात आहे. या निवासी शाळेला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसून निवासी प्रकल्पाचा संपूर्ण खर्च संस्था स्वतः समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने उचलत आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री.विनोद हाके, सचिव सौ. वैशाली चोरमले तसेच कार्याध्यक्ष श्री.कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवला जात असल्याची माहिती मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे यांनी दिली आहे.

    विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. इयत्ता दहावीला शिकवणाऱ्या सौ. विजया मठपती, सौ. हेमा गोडसे, श्री.पवन राठोड आणि श्री.पवार सर यांनी विशेष मेहनत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे तयार केले.

    या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद हाके, सचिव सौ. वैशाली चोरमले आणि कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

    मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्था करत असलेले हे कार्य समाजासाठी  निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

No comments