मुधोजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात
फलटण गंधवार्ता वृतसेवा दि.२२ -फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मानवविद्या शाखेच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या वतीने हाऊ टू फेस कॉम्पिटीटीव्ह एक्झाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान तसेच शुभेच्छा व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्राचार्य शिवाजीराव भोसले ऑडिटोरियममध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ए. एन. शिंदे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ग्राम महसूल अधिकारी प्राची बावळे उपस्थित होत्या. त्यांचा परिचय डॉ. ॲड. ए. के. शिंदे यांनी करून दिला. त्यांनी प्राची बावळे यांच्या शैक्षणिक वाटचालीचा व स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाचा आढावा घेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी प्राची बावळे यांनी हाऊ टू फेस कॉम्पिटीटीव्ह एक्झाम या विषयावर मार्गदर्शन करत स्पर्धा परीक्षांची तयारी करताना योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च ध्येय निश्चित करून सातत्याने परिश्रम करण्याचा सल्ला दिला. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी शिस्त, वेळेचे नियोजन आणि नियमित अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये, तर त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध असून अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाला आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. बी. गायकवाड यांनी केले, तर शेवटी डॉ. ए. एस. जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments