जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन निर्णय जाहीर करणार ; मी नगराध्यक्ष व्हावे अशी जनतेची आग्रही मागणी - समशेरसिंह नाईक निंबाळकर
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवावी व नगराध्यक्ष व्हावे अशी आग्रही मागणी जनतेमधून व्यक्त होत आहे. या मागणीच्या अनुषंगानेच फलटण शहरात आपण नागरिकांना भेटत आहोत व त्यांचे मनोगत ऐकून घेत आहोत, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याबाबत आपला निर्णय घेणार आहोत, असे प्रतिपादन फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक चेतन शिंदे, बाळासाहेब कुंभार आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर व सुभाषराव शिंदे यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना आपण जाऊन भेटत आहोत. नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत नागरिकांशी चर्चा करीत आहोत. त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत व मागणी होत आहे की, नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. फलटण नगरपालिकेमध्ये आपण नगरसेवक व विरोधी पक्ष नेता म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावली आहे. त्यामुळे आपण नगराध्यक्ष पदासाठी उभे रहा. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक वार्डांमध्ये नागरिकांशी भेटीद्वारे व प्रत्यक्ष चर्चेद्वारे संवाद साधत आहोत. नागरिकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे समजून घेण्याकरिता फलटण शहरात सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, व्यापारी अशा विविध वर्गातील घटकांशी व लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर व सुभाषराव शिंदे यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना व त्यांना मानणाऱ्या वर्गाला आपण जाऊन भेटत आहोत. प्रत्यक्ष भेटीद्वारे चर्चा करून त्यांच्या भावना, इच्छा व मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपण व चेतन सुभाषराव शिंदे हे करीत आहोत. सदर भेटी दरम्यान नागरिक व मतदार बंधू-भगिनी अशी मागणी करीत आहेत की, नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. आपणास राजकीय व प्रशासकीय यंत्रणा हाताळण्याचा अनुभवही चांगला आहे. आपणाकडे उत्कृष्ट संघटन कौशल्यही आहे. त्यामुळे आपण नगराध्यक्ष पदासाठी का उभे राहत नाही आणि या मागणीच्या अनुषंगानेच फलटण शहरात आपण नागरिकांशी संवाद साधत आहोत. एकंदरीत नागरिक आणि मतदार यांच्या मागणीनुसार आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याबाबत आपला निर्णय घेणार आहोत. नगराध्यक्ष पदाच्या माझ्या उमेदवारीसाठी जनतेतुन प्रचंड आग्रह आहे. या आग्रहाखातर, मागणी खातर आपण पुन्हा एकदा सर्व सामान्य नागरिकांना जाऊन भेटणार आहोत आणि त्यानंतर लोक जो निर्णय घेतील, पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार आपण आपला निर्णय घेणार आहोत असेही समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

No comments