नगराध्यक्ष पदासाठी अशोकराव जाधव यांचा अर्ज तर नगरसेवक पदासाठी ३ नामनिर्देशन दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.15 - फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी एकूण 3 अर्जांची नोंद झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अशोकराव जाधव यांनी अर्ज दाखल करून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. तसेच नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 5-ब आणि 7-ब मधूनही अशोकराव जाधव यांचे नामनिर्देशन प्राप्त झाले आहे. प्रभाग क्रमांक 9-ब मधून सचिन चंद्रकांत गानबोटे यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
निवडणुकीतील नामनिर्देशन प्रक्रियेचा वेग हळूहळू वाढत चालला असून येत्या दोन दिवसांत आणखी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध राजकीय गटांचे उमेदवार, संभाव्य इच्छुक तसेच समर्थकांमध्ये निवडणूक वातावरण तापू लागले आहे.
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असून, उमेदवारी अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
अपिल नसलेल्या नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ आहे.तर अपिल असलेल्या नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ आहे. निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

No comments