अपहरणाची धक्कादायक घटना: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाचे अपहरण
फलटण, दि. १४ जून २०२५ - काळज ता.फलटण येथील दत्त मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली असून, जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान अपहरण केल्यानंतर अल्पवयीन मुलास अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली असून, त्याला खुंटे ता. फलटण गावात सोडून दिले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
प्रतिक प्रमोद रणवरे (वय १७ वर्षे, रा. जिंती, ता. फलटण) यास दिनांक १२ जून २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मोन्या निंभोरे, अजय सपकाळ, प्रविण मोहीते, विजय सपकाळ व बंड्या जाधव (सर्व रा. साखरवाडी, ता. फलटण) या पाच जणांनी दोन पल्सर मोटारसायकलवरून मागून येत अडवले व जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.
अपहरणाची ही घटना जुन्या भांडणाच्या रागातून घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments