Breaking News

फलटण शहरातील पालखी रस्त्याच्या कामात ठेकेदार-अधिकारी यांच्यामुळे दिरंगाई

Delay in Palkhi road work

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. ९ जून २०२५ - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील पालखी मार्ग व चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पालखी मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर आणि शहरातील प्रमुख चौकांचे आकर्षक सुशोभीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. मात्र, प्रत्यक्षात कामाच्या नियोजनाचा अभाव आणि ठेकेदार-अधिकाऱ्यांची दुर्लक्ष वृत्ती यामुळे पालखी मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असून, त्यामुळे नागरिकांसोबतच पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनाही मोठी गैरसोय भोगावी लागत आहे.

    या कामाच्या दिरंगाईमुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही अनावश्यक दोष येऊ लागला आहे. पालखी मार्ग सिमेंट काँक्रीटचा करण्यामागे त्यांचा उद्देश वारकऱ्यांना व फलटणकरांना सुविधा देण्याचा होता. पालखी महामार्गांतर्गत फलटण शहरातील पालखी रस्ता व चौक सुशोभीकरणाच्या कामाचा समावेश करून, रणजितसिंह यांनी शहरातील पालखी मार्गाचा कायमचा प्रश्न मिटवला आहे. परंतु ठेकेदारांनी कामात चालवलेली अनास्था व दिरंगाई यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही, आणि त्यामुळे संपूर्ण विकासकामावरच टीका होऊ लागली आहे.

    यासंदर्भात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांनी ताशेरे ओढले आहेत. काही महिन्यांपूर्वी फलटण शहरात पालखीतळाची पाहणी करून गेलेल्या विश्वस्तांनी, "तेव्हा काहीच काम सुरू नव्हतं, आणि आता पालखी येण्याच्या ऐन तोंडावर रस्त्याचं काम सुरू करणं म्हणजे नियोजनाचा फज्जा," अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर व प्रशासनावरील नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

    फलटण पालखीतळाची व्यवस्था समाधानकारक असली तरी शहरातील रस्त्यांची अवस्था खड्डे, धूळ व खोदकामाने विद्रूप झाली आहे. पालखीपूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने प्रशासनावर जनतेचा आणि वारकऱ्यांचा रोष वाढत आहे.

No comments