Breaking News

मतदारांनी संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपाला घरी पाठवावे - खा. शरद पवार

Voters should send BJP home who wants to change the constitution - Sharad Pawar

      फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. ३ : भारतीय राज्य घटना आणि त्याआधारे संविधान निर्माण करुन या देशातील सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार जतन करण्याचे, त्यांना संरक्षण व अन्य अधिकार देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, मात्र आता सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते वेगळा विचार करीत असल्याचे दिसते तथापि वाट्टेल ती किंमत मोजून आम्ही त्याला विरोध करु किंबहुना घटना आणि संविधानाला हात लावू देणार नाही असा  इशारा देतानाच, मतदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीचा वापर करुन, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपाला घरी पाठवावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिला आहे.

    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४३ माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व मित्र पक्षांचे (इंडिया आघाडी) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित येथील गजानन चौकातील विराट जाहीर सभेत मार्गदर्शन करताना खा. शरद पवार बोलत होते, यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आ. रामहरी रुपनवर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे, डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, महेंद्र सूर्यवंशी बेडके, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन अनिल देसाई, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. प्रियालक्ष्मीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सौ. प्रतिभा शिंदे, सलक्षणा सलगर, माजी सभापती सौ. प्रतिभा धुमाळ, उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सह्याद्री चिमणराव कदम, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हाध्यक्ष संजय भोसले, विकास नाळे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे व त्यांचे सहकारी, संभाजी ब्रिगेड पंढरपूरचे दिपक वाघदरेकर, श्रीराम सहकारी साखर कारखाना चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विश्वासराव निंबाळकर, संतकृपा संस्था समूहाचे विलासराव नलवडे, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, सुभाषराव धुमाळ, ॲड. नरेंद्र कृष्णचंद्र भोईटे, विक्रमसिंह माने देशमुख, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, सनी अहिवळे, माजी नगरसेवक/नगरसेविका, आम आदमी, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआय, दलित पँथर वगैरे पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह फलटण शहर व पंचक्रोशी आणि फलटण, माण, खटाव, खंडाळा, माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निर्णय घेण्याचे, विकासाचे प्रश्न सोडविण्याचे अधिकार लोकांकडे असलेच पाहिजेत

    या देशातील लोकशाही कशी टिकेल याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या मुदती संपल्याने तेथील लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणून तेथील कारभार प्रशासकाच्या हातात देवून अनेक वर्षे झाली, मात्र या निवडणुका घेतल्या जात नाहीत,  या प्रश्नात लक्ष घालावे लागेल लोकशाहीने लोकांना दिलेले अधिकार या पद्धतीने काढून घेतले जात असल्याचे निदर्शनास आणून देत लोकांचे निर्णय घेण्याचे, आपल्या गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याचे अधिकार अशा पद्धतीने काढून घेण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक असल्याने त्याबाबत प्राधान्याने विचार करुन निर्णय घेण्याची आवश्यकता खा. शरद पवार यांनी बोलुन दाखविली.

    सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडविण्याची संधी

    बदलत्या परिस्थितीत सामान्य माणसाचे हित, त्याचा स्वाभिमान, त्याच्या समस्या याविषयी काम करण्याचा निर्धार आम्ही पुन्हा केल्यानंतर लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे, सामुदायिक शक्तीने भागाचा, जिल्ह्याचा, राज्याचा चेहरा मोहरा बदलता येतो यावर आपला विश्वास असल्याचे आवर्जून सांगत राज्य लोकांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी चालवायचे असते हा विचार नेतृत्वाने करायचा असतो, सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडविण्याची संधी आहे, त्यापासून दूर गेलात तर लोक माफ करणार नाहीत असा स्पष्ट इशारा खा. शरद पवार यांनी दिला.

    रघुनाथराजे यांचे भाषण ऐकून धक्का बसला : फलटणमध्ये पूर्वी आदर व आस्था होती

    आपण यापूर्वी अनेकवेळा फलटणला आलो, पण आज येथे आल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे यांचे भाषण ऐकून धक्का बसल्याचे सांगत ऐतिहासिक पार्श्वभूमी, छ. सईबाईचे माहेर, श्रीमंत मालोजीराजे यांचे फलटण अशी ओळख असलेल्या फलटणमध्ये आदर व आस्था होती आज सत्ता लोकांच्यासाठी जमिनीवर पाय ठेवून त्यांच्या हितासाठी वापरायची असते याचा विसर पडल्याचे दिसते, पण सत्ता डोक्यात शिरली तर सामान्य माणूस काही काळ सहन करतो, मात्र त्याच्या मर्यादा संपल्यानंतर तो अशा नेतृत्वाला त्याची जागा दाखवतो, त्यामुळे आता लोकांची सत्ता आणू त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील चांगले काम करतील, त्यांना त्यामध्ये अडचण आली तर आपण दिल्लीत आणि येथेही भक्कम साथ करु, लोकांची साथ आहेच तुम्ही काम करा असे स्पष्ट निर्देश देताना जवळपास धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाचे संकेतच खा. शरद पवार यांनी या सभेत दिले.

    फलटणकर एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत

    सत्तेच्या गैरवापरातून सामान्य माणसाला त्रास होत असेल तर सत्ता असो वा नसो त्यांना योग्य धडा शिकवावा लागेल असे मत व्यक्त करताना त्या प्रक्रियेत तुम्ही फलटणकर एकटे नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास खा. शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केला.

    श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे सहकार्य, मार्गदर्शन, भक्कम साथ होती

    साखर कारखाने, पाट बंधाऱ्याचे पाणी ही बाब फलटण पुरती सिमीत नव्हती त्याला व्यापक स्वरुप होते, जाचक, शेंबेकर, आपटे, आगाशे, निंबाळकर वगैरेंनी सणसर, माळेगाव, सोमेश्वर, साखरवाडी साखर कारखान्यांची उभारणी केली पण त्यांना श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचे सहकार्य, मार्गदर्शन, भक्कम साथ होती याचा उल्लेख करताना, श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ३०/३५ वर्षे या भागाच्या हितासाठी केलेले प्रयत्न लाख मोलाचे असल्याचे गौरवोद्गार खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

    आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिकूल परिस्थीतीतही सर्वांना बरोबर घेऊन उत्तम काम केले

    सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी नियोजन पूर्वक सर्वांना बरोबर घेऊन उत्तम काम केले, त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिकूल परिस्थीतीतही सर्वांना बरोबर घेऊन उत्तम काम केल्याचे आवर्जून सांगताना श्रीमंत रामराजे हे एकाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करुन, प्रश्नाची सोडवणूक अत्यंत कुशलतेने करतात हे त्यांच्या कामकाज पद्धतीचे वैशिष्ठ्य असून राज्यातील कायम दुष्काळी पट्ट्यातील पाणी प्रश्नाचा अखंडित प्रयत्न करुन अत्यंत धाडसाने, प्रामाणिकपणे, आत्मविश्वासाने त्यांनी प्रश्नाची सोडवणूक केल्याचे खा. शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले. या भागातील विविध प्रश्नांची सोडवणूक श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या तर....

    गत निवडणुकीत कोणताही स्वार्थ न ठेवता पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि भाजप मध्ये प्रवेश करुन त्यांच्या एका उमेदवाराला रात्रीत आमदार आणि एकाला १५ दिवसात खासदार केले, एक जिल्हा परिषद, ३ नगर परिषदा,  वगैरे सत्तास्थाने यांच्या ताब्यात दिली आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या तर यांना या भागातील लोकशक्तीची ताकद दाखविली असती असे स्पष्ट प्रतिपादन उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

    देशाचे गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र या महत्वाच्या खात्यांचा कारभार अत्यंत उत्तम प्रकारे करुन आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा देश परदेशात उमटविणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत गेल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणे अपेक्षीत होते, किमान त्यांच्या कर्तुत्वाची आठवण सभेत व्यक्त केली नसल्याबद्दल खा. शरद पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

फलटण, माळशिरस तालुक्यांचा समावेश केल्यावरच प्रस्तावावर सही

    शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्री मंडळात पाटबंधारे मंत्री असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाटबंधारे प्रकल्पाच्या आराखड्यावर सही केली नाही, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्व. वसंतदादा पाटील यांच्याकडे तक्रार केल्यावर फलटण, माळशिरस तालुक्यांचा त्यामध्ये समावेश नसल्याने त्या प्रस्तावावर सही केली नसल्याचे सांगताच त्यामध्ये या कायम दुष्काळी तालुक्यांचा समावेश करुन घेऊन विजयदादांनी त्यास संमती दिल्याचे निदर्शनास आणून देत अशा पद्धतीने प्रकल्प उभे राहिले असून आता प्रकल्प उभे राहून पाणी शिवारात पोहोचत असताना पाणीदार आणि जलनायक बिरुदावली घेऊन फिरणारी जोडगोळी लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी नसल्याचे मतदारांनी ओळखले असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

    फलटण - पुणे प्रवासाला ५ तास हा यांचा विकास

    फलटण तालुक्यात आणि माढा लोकसभा मतदार संघात विकास केल्याचे सांगत आपण तासाला हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे आणि विकास केल्याचे सांगणाऱ्या खासदारांचा विकास प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण या मतदार संघातील सर्व ८३८ गावात शोध घेतला पण विकास दिसलाच नसल्याचे सांगत फलटणच्या विकासाची माहिती देताना रेल्वे गेटवर माणूस नसल्याने रेल्वेचा ड्रायव्हर सदर गेट स्वतः उघडुन/बंद करुन रेल्वे घेऊन जात असल्याने फलटण - पुणे या अर्ध्या तासाच्या प्रवासाला ५ तास लागतात हा यांचा विकास असल्याचे सांगत अशा ठिकाणी गेटमन किंवा अंडर पास, ओव्हर ब्रीज असायला हवेत हे धैर्यशील मोहिते पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

    पाणीदार व जलनायक जोडगोळी आपणच पाणी आणल्याचे सांगतात....

    आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी रात्रंदिवस मेहनत घेतल्याने कृष्णेचे पाणी शिवारात पोहोचले, तथापि अनुशेषाच्या मुद्यावर पाटबंधारे प्रकल्पांच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध झाला नाही, या कामांना स्थगिती देण्यात आली आता स्थगिती उठल्याने कामे पुन्हा सुरु झाली मात्र त्याचे श्रेय घेत ही पाणीदार व जलनायक जोडगोळी आपणच पाणी आणल्याचे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

    इथला शेतकरी पाणीदार करण्याची ग्वाही....

    जनशक्ती आणि खा. शरद पवार यांनी विश्वासाने उमेदवारी दिल्याने आपण माढा लोकसभा निवडणुकीत आहोत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची ग्वाही देत आपण  इथला शेतकरी पाणीदार करण्याची ग्वाही देत लोकसभेच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजनांमधून भरीव निधी आणून संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघाच्या  सर्वांगीण विकासाची ग्वाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी दिली.

    आपण खूप संघर्ष केला..

    कार्यकर्त्यांची होणारी घुसमट, त्यांच्यावर दाखल होणारे खोटे गुन्हे, प्रशासनाकडून होणारी सर्वसामन्यांची अडवणूक यामुळे आपल्याला (खा. शरद पवार यांना) सोडून जावे लागल्याची खंत व्यक्त करताना,  आपण दिलेली संधी, त्यातून लाभलेली ताकद आम्ही विसरु शकत नसल्याचे निदर्शनास आणून देत गेल्या ५ वर्षात आपल्यासह आपल्या लोकांवर दाखल झालेले अनेक खोटे गुन्हे, झालेली अडवणूक याविषयी सविस्तर माहिती जाहीर सभेत खा. शरद पवार यांच्या समोर ठेवत आपण खूप संघर्ष केल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

आपली ताकद, मार्गदर्शन, साथ यामुळे लोकहिताच्या कामात यशस्वी

    श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी स्वातंत्र्य मिळताच लोकहिताला प्राधान्य देत आपले संस्थान संविधानात सर्वप्रथम विलीन केले मात्र त्यांना खूप संघर्ष करावा लागला, त्यानंतर गेली ३०/३५ वर्षे लोकहिताच्या कामासाठी झोकून देवून काम करणाऱ्या आ. श्रीमंत रामराजे यांनाही मोठा संघर्ष करावा लागला पण आपण दिलेली ताकद, केलेले मार्गदर्शन, विकासाच्या वाटेवर चालण्यासाठी केलेली साथ यामुळे लोकहिताच्या कामात आ. श्रीमंत रामराजे यशस्वी झाल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी आवर्जून सांगितले.

अपप्रवृत्ती लोक हितकारी राजकारण व समाजकारणातून हद्दपार करण्याची संधी

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन अनिल देसाई यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका करताना ह्या अपप्रवृत्ती इथल्या लोक हितकारी राजकारण व समाजकारणातून हद्दपार करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे, त्यांना सोडू नका असे आवाहन उपस्थितांसह रामराजे, रघुनाथराजे, संजीवराजे यांना केले.

    यावेळी युवराज श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे, श्रीमंत विश्वजितराजे, सौ. प्रतिभा शिंदे, सह्याद्री कदम, शंभूराज खलाटे, विकास नाळे, संजय भोसले, संभाजी ब्रिगेड पंढरपूरचे दिपक वाघदरेकर, सलक्षणा सलगर, धैर्यशील लोखंडे वगैरेंची समयोचीत भाषणे झाली. प्रा. भिमदेव बुरुंगले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

No comments