Breaking News

जलनायक नही खलनायक है तू.. ; नीरा देवघरच्या संपूर्ण माहितीसह श्रीमंत रामराजे यांनी केले विरोधकांच्या आरोपाचे खंडन

पत्रकार परिषदेमध्ये  बोलताना श्रीमंत रामराजेनाईक निंबाळकर समवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
Shrimant Ramraje refuted the allegation of the opposition with the complete information of Neera Deoghar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - विरोधक म्हणतात नीरा देवघरचे बाकीचे काम त्यांनी पूर्ण केले, परंतु नीरा देवघर पूर्ण होण्यासारखे राहिले काय होते? धरण तर पूर्ण झाले होते, कालवे खंडाळा पर्यंत पूर्ण झाले होते, राहिले होते ते फक्त फलटण, माळशिरस पर्यंतचे कालवे. आणि तेही  निधी अडचणीमुळे  कालव्याचे काम प्रलंबित राहिले होते.  आता विरोधक त्याचे भांडवल करून, मी एवढा निधी आणला, नीरा देवघर पूर्ण केले अशा बढाया मारत आहेत, प्रकल्पाला पूर्वीच  मान्यता होती आणि  भाववाढ झाल्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता खासदारांच्या काळात मिळाली आहे. नीरा देवघर तयार होताना नदी खोऱ्यामधून प्रत्येक माणसाकडे जाऊन मी जमिनी संपादन केलेल्या आहेत, इंजिनिअर सोबत मी, पायी जाऊन, त्या त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे,  प्रकल्पग्रस्तांनी साथ दिली नसती तर हे प्रकल्प झाले नसते. त्यावेळी  मी प्रकल्पग्रस्तांकडे जाऊन बसत होतो, त्यामुळे धरणे प्रत्यक्षात आली आहेत. खासदार मात्र याचे श्रेय लाटू लागले आहेत, म्हणजे सर्व कष्ट आम्ही घ्यायचे आणि विरोधकांनी सांगायचे की माढ्याचे खासदार हे जलनायक झाले आहेत,  परंतु माझ्या समजुतीनुसार हे जलनायक नसून, खलनायक झालेले आहेत अशी टीका विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये  श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकीय कारकीर्दीचा केंद्रबिंदू पाणी

अपक्ष आमदारांना एकत्र करून,  युती सरकार काळात, कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो व कृष्णा खोऱ्याचे काम सुरू केले. नीरा देवघर धरण हे १९९६ च्या पुढे सुरु झाले, कालव्याची टेंडर निघाली, ६६ किलोमीटर म्हणजेच खराडवाडी तालुका खंडाळा पर्यंत पाणी आले. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रा समोर कृष्णा खोऱ्या अंतर्गत आपल्याला ३१ मे २००० पर्यंत, पाणी कायमस्वरूपी सुरक्षित ठेवायचे असेल तर, पाणी आडवायला लागणार हे माझ्या लक्षात आले.  त्या दिवसापासून आजतागायत माझ्या राजकीय कारकीर्दीचा पाणी हा केंद्रबिंदू मानून, मागील ३० वर्षांपासून कृष्णा पाणी लवाद व कृष्णा खोरे महामंडळ अंतर्गत प्रकल्पावर अखंडपणे काम करून दुष्काळी भागाची तहान भागवली असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

नीरा देवघरचे पाणी पळवल्याचे सत्य

नीरा देवघर प्रकल्पातील कालव्यांचे काम पूर्ण होईपर्यंत, निरा देवघरचे पाणी नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालव्यास विभागून देण्यात आले होते. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाल्यापासून, त्यांचे मित्र आमदार जयकुमार गोरे व छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी, निरा देवघरचे पाणी पळवले असा आरोप करण्यास सुरू सुरुवात केली, राजकीय ताकतीचा वापर करून निरा देवघर संबंधात काही जीआर काढले. परंतु, त्यामध्ये बारामतीला गेलेले पाणी, नीरा उजवा कालव्यात न टाकता, ते पाणी निरा देवघर धरणाच्या लाभ क्षेत्राबाहेर सिंचन उपसा योजनांना द्यावे असा विचित्र जीआर काढला. त्यामुळे डाव्या कालव्यासोबत आपल्याला उजव्या कालव्यास मिळणारे नीरा देवघरचे जादाचे पाणी देखील बंद करण्यात आले. आदेश काढण्यापूर्वी मात्र  उजव्या कालव्यास पाण्याची जास्त आवर्तन मिळत होती, त्यामुळे नीरा उजवा कालव्याखाली फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर पर्यंतचा पट्टा ऊस उत्पादक म्हणून पुढे आला. फलटण मध्ये  पूर्वी दोन कारखाने चालेल एवढा ऊस उत्पादित होत होता, परंतु पाणी आल्यानंतर आज चार साखर कारखाने चालेल एवढा ऊस उत्पादित होत आहे, पाणी वाटपामुळे पंढरपूर पर्यंत सर्व भागाचा फायदा झाला.  आणि विरोधक मात्र म्हणतात की, रामराजे यांनी सत्तेसाठी पाणी बारामतीला दिले, परंतु बारामतीच्या पाण्याबरोबर, नीरा उजव्या कालव्याला देखील जास्तीचे पाणी मिळत होते, त्यामुळेच हा सर्व भाग ऊस उत्पादनात पुढे आला असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

कृष्णा खोऱ्याचा मी मंत्री असताना, प्रथम धरणे पूर्ण करून घ्यावी व त्यानंतर कालव्याचे काम पूर्ण करावे असा निर्णय घेण्यात आला होता.२००६-०७ साली नीरा देवघर धरण पूर्ण झाले व त्यानंतर कालवे बांधण्याचे काम सुरू झाले. खंडाळा तालुक्यात ६६ किलोमीटर पर्यंत कालवे तयार देखील झाले. मात्र निरा देवघरचे पाणी लिफ्ट केल्यानंतर पुढे येणार होते, त्यामुळे धोम बलकवडीच्या कालव्यांना प्राधान्य देऊन ते धोम बलकवडी कालवे पूर्ण करून घेतले. नीरा देवघर प्रकल्पातील कालव्यांचे काम पूर्ण होईपर्यंत, निरा देवघरचे पाणी तात्पुरते नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालव्यास विभागून देण्यात आले होते. नीरा देवघरचे कालवे पूर्ण झाल्यानंतर बारामतीला जादा पाणी मिळणारच नव्हते, कारण बारामती तालुका हा निरा देवघरच्या लाभ क्षेत्रातील तालुका नाही, नीरा देवघर धरणाच्या लाभ क्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस एवढेच तालुके आहेत. सुरुवातीला माळशिरस नव्हते परंतु विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने माळशिरस वाढवण्यात आले असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

फलटण तालुक्याला झुलवले?

विरोधक माझ्यावर आरोप करतात की, मी फलटण तालुक्याला झुलवले परंतु धोम बलकवडी धरण पूर्ण करून जर कालवे पूर्ण केले नसते, तर फलटण तालुक्यात स्वराज एग्रो इंडिया व शरयू कारखाना सुरू झाला असता का ? हे दोन्ही कारखाने बलकवडीच्या पाण्यावर उभे राहिले आहेत. पाणी आणले म्हणूनच फलटण मध्ये  पूर्वी दोन साखर कारखाने होते त्याचे आज चार साखर कारखाने झाले असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.

खासदार याच पत्राची ते वाह! वाह! मिळवत आहेत

नीरा देवघर धरणाच्या पाणीवाटपाबाबत खासदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जानेवारी २०२३ मध्ये पत्राद्वारे माळशिरस, पंढरपूर व सांगोला यांना पाणी देण्यासंदर्भात मागणी केली आहे आणि याच पत्राची ते वाह! वाह! मिळवत आहेत. या पत्रामध्ये मागणी केली आहे की, नीरा देवघरचे पाणी  फलटण तालुका वगळून बंदिस्त पाईपलाईन द्वारे थेट नातेपुते येथे नीरा उजव्या कॅनॉलमध्ये सोडावे आणि तेथून माळशिरस पंढरपूर व सांगोला यांना प्रत्येकी एक टीएमसी पाणी द्यावे, म्हणजे फलटण सोडायचे आणि बाकीच्यांना पाणी द्यायचे, तर माझा प्रश्न त्यांना एवढाच आहे की,  फलटण व खंडाळा तालुक्याने पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या, त्यांना उत्तर तुम्ही काय देणार?  माझा पंढरपूर व सांगोल्याला पाणी देण्यास विरोध नाही, माळशिरसला तर हक्काचे पाणी आहे. मी कधीही संगोल्याला पाणी देण्यास विरोधात नाही, फक्त आमचं भागवून तुम्ही पाणी द्यावे असे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले.

सांगोल्याला पाणी देण्याच्या विरोधात नाही

म्हैसाळचे पाणी संगोल्यात मी आणले आहे, जवळ्याच्या ओढ्यातून सांगोल्याला जाऊन पाणी पूजन मी केले आहे, टेंभूचे पाणी आज सांगोल्याला मिळत आहे, मी कित्येक क्लृप्त्या लढवून ४५ किलोमीटर जाणारा टेंभूचा कालवा हा माझ्या कारकिर्दीत पूर्ण केला आहे. पाण्याचा फेर विचार  झाला असता तर, म्हैसाळ, टेंभू बंद पडले असते,  कारण सांगोला हा तालुका या योजनेच्या शेवटच्या टोकाला होता, परंतु अडचणींवर मात करत, मी सांगोल्या पर्यंत पाणी पोहोचवले, ही कामगिरी करायला माझी २० ते २५ वर्षे गेली आहेत आणि याच्यामागे  शरद पवार यांची ताकद होती, म्हणून हे पूर्ण होऊ शकले आहे.  मी सांगोल्याला पाणी देण्याच्या कधीही विरोधात नव्हतो आणि आजही नाही, फक्त आमच्या तालुक्यांनी पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या, त्याग केला, त्या तालुक्यांची तहान भागवून पुढे पाणी द्यायला पाहिजे, हे तीन टीएमसी पाणी जे आहे, त्याचे फेरवाटप समन्यायी तत्त्वाने व्हावे, खंडाळा, फलटण व माळशिरस यांच्यात योग्य प्रमाणात पाणीवाटप होऊन, उर्वरित पाणी सांगोल्याला देण्यास आमची हरकत नाही असे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

No comments