दिगंबर आगवणे यांच्यावर १ कोटी रुपयांची फसवणुक व खोटा दस्तऐवज तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ एप्रिल - स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण या संस्थेकडून एक कोटी रुपये कर्ज घेताना, दिगंबर आगवणे यांनी मौजे सुरवडी ता. फलटण गावचे हद्दीतील जमिनिची कायदेशीर मालकी नसताना, ती जमीन संस्थेस तारण म्हणून देऊन संस्थेची फसवणूक व खोटा दस्तऐवज तयार केल्या प्रकरणी दिगंबर आगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ एप्रिल २०१६ पासून आजपर्यंत दिगंबर आगवणे यांनी स्वराज नागरी पतसंस्था व उपनिबंधक कार्यालय फलटण येथे स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणूक केली आहे. दिगंबर आगवणे हे स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद असून, त्यांनी एक कोटी रुपयाचे कर्ज मागणी करून, त्याकरिता तारण म्हणून मौजे सुरवडी तालुका फलटण गावच्या हद्दीतील गट नंबर ४८/२ मधील एकूण क्षेत्र ४ हेक्टर २२ आर मधील हिस्सा २ हेक्टर ४६ आर या स्थावर मिळकतीवर कायदेशीर मालकी नसताना, ती जमीन आपली आहे असे भासवून, स्वराज पतसंस्थेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तारण/ गहाण म्हणून दिली आहे. तसेच सदर मिळकत जास्त किंमतीची असल्याचे भासवून, तसा बनावट सर्च रिपोर्ट घेऊन, कर्ज रक्कमेसाठी गहाणखत करून स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच कर्ज वसुलीतून बगल देण्यासाठी माजी चेअरमन व संचालक मंडळ यांची वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमात द्वारे खोटी व बदनाम कारक वक्तव्य केली असल्याची तक्रार फलटण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक १७७/२२ प्रमाणे, स्वराज नागरी सहकारी पतसंस्था, फलटणचे शाखाधिकारी दत्तराज शिवाजीराव फडतरे यांनी दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने सदर प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिल्याने दिगंबर आगवणे यांच्या विरुद्ध फसवणुक व खोटे दस्तऐवज तयार करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.

No comments