हा घ्या नगर परिषदेच्या लाईट थकबाकीचा पुरावा! मुख्याधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल- समशेरसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० डिसेंबर - फलटण नगर परिषदेच्या कोणत्याही विभागाचे लाईट बिल थकीत नसल्याच्या, मुख्याधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, नगर परिषदेच्या लाईट बिल थकबाकीचा पुरावाच जाहीर करून, नगर परिषदेच्या विरोधी पक्षाने, दुध का दूध, पाणी का पाणी केले. मुख्याधिकारी यांनी फलटणच्या नागरिकांची दिशाभूल केली आहे. या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असून, नगर परिषदेच्या प्रशासकपदी प्रांतांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेर सिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी मा. नगरसेवक अशोकराव जाधव, मा. नगरसेवक सचिन अहिवळे, मा. नगरसेवक डॉ. प्रविण आगवणे उपस्थित होते.
फलटण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे लाईट बिल थकीत असल्याने महावितरण कडून नगरपालिकेची लाईट तोडण्यात आली होती. परंतु नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कोणतीही थकबाकी नसल्याचे व लाईट न तोडल्याचे वक्तव्य केले होते, या प्रकरणी आम्ही महावितरण कडून रीतसर अर्ज करून लाईट कट केल्याबाबतचा लेखी पुरावा आणला असल्याचे अशोकराव जाधव यांनी यावेळी सांगितले.
नगरपालिकेची लाईट कट केल्यानंतर, आम्ही जर आवाज उठवला नसता, तर पुढील चार ते पाच दिवस नागरिकांना पाणीपुरवठा झाला नसता, परंतु वेळीच आम्ही आवाज उठवला म्हणून, नगरपरिषदेकडून लगेच थकबाकी रक्कम भरून लाईट पूर्ववत जोडण्यात आली, त्यामुळे पाणीपुरवठाही पूर्ववत झाला असल्याचे अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी यांनी केलेल्या जनतेच्या दिशाभूल संदर्भात आम्ही तक्रार दाखल करणार असून, फलटण नगर परिषदेच्या प्रशासकपदी प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली.
No comments