Breaking News

फलटणच्या प्रांतांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी

Phaltan sub-divisional officer thrashed and threatened to kill

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ डिसेंबर - अवैध वाळू वाहतूक प्रकरणी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करण्याचा  प्रकार  शहरात घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी कैलास महादेव ननावरे  झिरपे गल्ली, मंगळवार पेठ फलटण या संशयीतास अटक केली आहे. 

     फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार  दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सजाई गार्डन येथील मिटींग आटोपून प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप हे तहसिलदार समिर यादव इतर अधिकाऱ्यांसमवेत जाधववाडी येथून फलटणकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना एक हायवा ट्रक वाळू वाहतूक करताना, जाधवाडीकडून फलटणकडे जाताना दिसला. त्यास थांबवुन चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्र नसल्याने वाळूचा व वाहनाचा पंचनामा, जप्ती पंचनामा करून गाडी ताब्यात घेतली. सदर हायवा ट्रक पोलीस स्टेशनकडे नेत असताना, गिरवी नाका येथे आल्यावर एक इसम गाडीसमोर आडवा येऊन तलाठी धेंडे यांना म्हणाला की, माझी गाडी, मी घेऊन जाणार आहे. त्यावेळी त्यास प्रांत शिवाजीराव जगताप यांनी आपण स्वतः प्रांताधिकारी असून, सदर गाडीत वाळू असून त्यास परवाना नाही. त्यामुळे गाडी पोलीस स्टेशनला घेऊन निघालो आहे असे सांगितले. सदर इसमास नाव विचारले असता त्याने कैलास ननावरे असे नाव सांगत तो प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अंगावर धावून आला व मी तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून त्यांना धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली व  शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी स्वतः प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी कैलास महादेव ननावरे यास अटक केली आहे. पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

No comments