नाईकबोमवाडी एमआयडीसी क्षेत्राच्या मोजणीचे कामकाज सुरू - अॅड. सौ.जिजामाला नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण, माण, माळशिरस या तालुक्यातील युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा, या तालुक्यास आर्थिक स्थैर्य व पूर्व भागाचा विकास व्हावा या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सध्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून, नाईकबोमवाडी येथे तालुक्यातील दुसरी एमआयडीसी मंजूर करण्यात आली होती. शासकीय नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारने जमीन अधिग्रहण करून घेतली व त्यावर औद्योगिकीकरणाचे शिक्के पडले. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून या क्षेत्राची मोजणी राज्य शासनाच्या वतीने एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व मोजणी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली आहे. याची प्रत्यक्ष पाहणी आज जिल्हा परिषदेच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, तातमगिरी देवस्थान ट्रस्टचे संचालक राजेंद्र निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूराव चव्हाण, काकासाहेब खराडे व परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करण्यात आली.
या एमआयडीसीने 186 हेक्टर संपादित केली आहे, तसेच गावातील ग्रामस्थांनी साधारणतः 120 हेक्टर जमीन स्वतःहून एमआयडीसीला देऊ केली आहे. एमआयडीसी लवकरच पूर्णत्वास येईल. रोजगार उपलब्ध होईल. आणि या भागास आर्थिक स्थिरता प्राप्त होईल असा विश्वास अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
No comments