Breaking News

पं.स. सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांच्या घरी चोरी ; 15 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास

Burglary at Shivarupraje Khardekar's house; Theft of jewelery and cash worth Rs 15 lakh 20 thousand

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या आसू ता. फलटण येथील निवासस्थानामध्ये धाडसी चोरीचा प्रकार घडला असून सोन्याचे दागीने व रोकड असा एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज आज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. 

       फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, ६ जुलै ते ११ जुलै व २४ जुलै ते २९ जुलै या दरम्यान शिवरुपराजे खर्डेकर यांच्या आसू ता. फलटण येथील निवासस्थानातील त्यांच्या व त्यांच्या सुनबाईंच्या बेडरुम मधील लोखंडी कपाट चावीने उघडून, त्यामधील सात लाख रुपयांची रोख रक्कम, पाच लाख रुपये किंमतीचे डायमंडचे सोन्यामध्ये केलेले नेकलेस, दिड लाख रुपये किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, एक लाख २० हजार रुपये किंमतीची चार तोळे वजनाची पेंडल असणारी सोन्याची लेडीज चैन व पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण पंधरा लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सदर ऐवज लंपास केल्यानंतर कपाट पुन्हा चावीने बंद करुन ठेवण्यात आले होते. या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदर चोरीची फिर्याद शिवरुपराजे खर्डेकर यांनी दिली असून पुढील तपास सपोनि सोनवणे हे करीत आहेत.

        दरम्यान फलटण पंचायत समितीच्या सभापतींच्या निवासस्थानी चोरट्यांनी धाडसाने मोठ्ठा डल्ला मारल्याने ग्रामीण भागामध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करावी अशी मागणी होत आहे.

No comments