फलटण मधील व्यवसाय-व्यापार दुकाने सुरु करावीत - व्यापारी संघटनांची मागणी
![]() |
| उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे निवेदन देताना विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 8 - कोरोना पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करून, विविध दुकाने, व्यापारी यांना आपला व्यावसाय सुरू करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
व्यापारी संघटनांकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप,तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक किंद्रे यांच्याशी व्यापार्यांनी चर्चा केली. अधिकारी व व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेत, व्यापाऱ्यांचे म्हणणे नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवु असे आश्वासन उपविभागीय अधिकारी श्री. शिवाजीराव जगताप यांनी दिले व दोन दिवस मध्ये आपल्याला निर्णय कळवू तोपर्यंत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे अशी त्यांनी विनंती केली आहे. यावेळी वसीम आमीरभाई मणेर, मंगेश दोशी, राजेश हेंद्रे, दिगंबर कुमठेकर, निजाजभाई आतार, जाकिरभाई मनेर, हिनाकौसर वसीम मनेर व इतर प्रमुख व्यापारी उपस्थित होते.
व्यापारी संघटनांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे फलटण शहरातील बाजारपेठ अधिककाळ बंद राहिल्याने व्यापारी, छोटे व्यावसाईक, हातगाडीवाले, वडापाव, वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते त्याचप्रमाणे या व्यवसायातील नोकरदार रिक्षा, माल वाहतुकीचे वाहनधारक वगैरे सर्व घटकांचे फलटण शहरातील अत्यावश्यक सेवा वगळून व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून इतर जनरल असणाऱ्या व्यापाऱ्यांची कुचंबना होत आहे.
मुळातच सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच या व्यावसायिक / दुकानदारांकडे येणारे ग्राहक हे फार कमी प्रमाणात असतात. अत्यावश्यक वस्तू बरोबर मद्य विक्री आशा व्यवसायांना प्राधान्य देऊन शासनाने कापड, चप्पल भांडी, इस्त्रीवाले, हार्डवेअर, ऑटोमोबाईल्स, प्रिंटींग प्रेस या कमी प्रमाणात गर्दी करणारे व्यवसायावर अन्याय केलेला आहे. व्यापारी देणे बँकचे हप्ते, लाईट बिल, कामगारांचे पगार, घरखर्च यामुळे सर्वसामान्य व्यापारी हतबल झाला आहे.
जिल्हाधिकारी साहेब तसेच फलटणचे प्रांताधिकारी साहेब यांना फलटणच्या व्यापान्यांची नम्र विनंती आहे की, आपण त्वरित आपला निर्णय बदलून दुकाने वालू ठेवण्यास आम्हाला परवानगी द्यावी. आम्ही प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करू. कोरोना हृदपार करण्यासाठी कायमच मदत करत आलो आहोत. यापुळे सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर, वेळचे बंधन पाळून शासनास सहकार्य करू, तसेच सर्व स्तरातील व्यापारी यांना कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लस उपलब्ध करून द्यावी. व्यापाऱ्यांना फ्रंटवर काम करावे लागते त्याचबरोबर कामगार वर्ग ही असतो. शासनाने आमची विनंती मान्य करून तात्काळ सहकार्य करावे, ही सर्व संघटना असोसिएशन्स, छोटे मोठे व्यावसायिक / दुकानदार यांच्यातर्फे नम्र विनंती. आपला निर्णय कळवे पर्यंत आपण कोणतीही कारवाई करून व्यावसायिक / दुकानदार यांना त्रास होऊ देऊ नये, ही कळकळीची विनंती आहे.
आम्ही आपल्या निर्णयाची वाट गुरुवारपर्यंत पहात आहोत. शुक्रवारपासून आम्ही आमचे व्यवसाय इतर व्यवसायांच्या वेळेत सुरू करणार आहोत याची नोंद घेण्यात यावी असे निवेदन, फलटण तालुका व्यापारी महासंघ, फलटण तालुका व्यापारी वेलफेअर, असोसिएशन फलटण व्यापारी संघटना, फलटण फलटण शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व दुकानदार यांनी दिले आहे.

No comments