Breaking News

लहान मुलीस वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा कांबळेश्वर बंधाऱ्यात बुडून मृत्यू

कांबळेश्वर बंधाऱ्यात तरूणाचा मृतदेह शोधताना महाबळेश्वर ट्रेकर्स 
A youth who went to rescue a little girl drowned in Kambleshwar dam

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. ७ जून - कांबळेश्वर ता. फलटण येथील बंधाऱ्यात पडलेल्या लहान मुलीस, वाचवण्यासाठी गेलेल्या युवकांपैकी एका युवकाचा, बुडून मृत्यू झाला. लहान मुलीस वाचवण्यात यश आले आहे. परंतु तिला वाचवण्यासाठी गेलेल्या  युवकाचा  बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने कांबळेश्वर बंधाऱ्यात युवकाचा, मृतदेह शोधण्यात आला.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२१ रोजी ५ वाजण्याच्या सुमारास, शुभम ऊर्फ जयेश हा त्याचा मावस भाऊ अजिंक्य रमेश साठे रा.कांबळेश्वर ता.बारामती जि.पुणे याच्या सोबत अजिंक्यच्या मित्राकडे सस्तेवाडी ता.फलटण येथे जात असताना, कांबळेश्वर ता. फलटण येथील बंधाऱ्यावरून जात असताना, त्यांना एक लहान मुलगी बंधाऱ्याच्या पाण्यात पडलेली दिसली, त्यामुळे  अजिंक्य साठे व तेथेच मासे पकडत असलेल्या अजिंक्यचा मित्र रोहित संतोष वाघमारे असे दोघांनी पाण्यात उड्या मारुन, त्या मुलीच्या दिशेने जात असताना, शुभम ऊर्फ जयेश याने देखील बंधाऱ्याच्या पाण्यात उडी मारली, परंतु शुभम ऊर्फ जयेश पाण्यातुन वरती आला नाही. म्हणुन अजिंक्य व त्याच्या मित्रांनी पुन्हा पाण्यात उड्या मारुन बंधाऱ्यातील पाण्यात शोध घेतला, परंतु शुभम ऊर्फ जयेश कोठेही मिळुन आला नाही. त्यानंतर दि. ७ जून २०२१ रोजी सकाळी 11.00 वाजणेचे सुमारास महाबळेश्वर येथिल ट्रेकर्सच्या मदतीने शुभम ऊर्फ जयेश चा बंधाऱ्याच्या पाण्यात शोध घेतला असता, तो 11.15 वा. चे. सुमारास बंधाऱ्याचे पाण्यात मयत स्थितीत मिळुन आला. शुभम ऊर्फ जयेश संतोष भिसे वय 18 वर्षे रा.टिंगरेनगर विश्रांतवाडी पुणे हा बंधाऱ्याच्या पाण्यात पडुन बुडुन मयत झालेला आहे. 

    अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार यादव करीत आहेत. 

No comments