Breaking News

फलटण तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत 29 जानेवारी रोजी

reservation for Sarpanch post in Phaltan taluka on 29th January

        फलटण दि. 24 जानेवारी 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पडल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हयातील 1495 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाचे तालुकानिहाय वाटप केलेले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे तालुक्यातील सर्व 131 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी कळविले आहे.

        फलटण तालुक्यासाठी एकूण 131 ग्रामपंचायतीचे आरक्षण वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती साठी 19 सरपंचपदे आरक्षित राहणार असून त्यामध्ये 10 महिला व 9 जागा खुल्या (स्त्री अथवा पुरुष), अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षित असून सोडतीद्वारे महिला/खुला प्रवर्ग निश्चित करण्यात येणार आहे.

        नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (OBC) 35 पदे आरक्षित करण्यात येणार असून त्यापैकी 18 पदे महिलांसाठी आणि 17 पदे खुली (स्त्री अथवा पुरुष) राहणार आहेत.

        खुल्या (सर्वसाधारण) गटासाठी 76 पदे आरक्षित करण्यात येणार असून त्यापैकी 38 महिलांसाठी आरक्षित राहणार असून उर्वरित 38 पदे खुली (स्त्री अथवा पुरुष) ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी कळविले आहे.

        याप्रमाणे जिल्हाधिकारी सातारा यांनी फलटण ग्रामपंचायत आरक्षण वाटप केले असून शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता सरपंच पदाचे गाव निहाय आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे.

No comments