वाढीव बिले कमी होत नाहीत तोपर्यंत घरपट्टी भरु नये - अशोकराव जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी बिलासंदर्भात केलेल्या अपीलाच्या सुनावणी दरम्यान कोणताही आदेश न देता वाढीव रक्कमेची बिले नगर परिषदेकडून पाठवली गेली आहेत, तर ती घरपट्टी बिले कमी होत नाहीत तोपर्यंत कोणीही घरपट्टी भरु नये असे आवाहन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ५०% घरपट्टी माफ करावी अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
फलटण नगर परिषदेने २ वर्षापुर्वी अमरावतीच्या कंपनीकडून फलटण शहरातील घरे व व्यापारी गाळयांचा सर्व्हे केला होता. त्यावेळी त्यांनी घरपट्टीच्या दरात जवळजवळ तीन पटीने वाढ केलेली होती. त्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात त्यावेळी अँड. नरसिंह निकम अध्यक्ष, फलटण तालुका कृती समिती, समशेरसिंह नाईक निंबाळकर विरोधी पक्ष नेते फलटण नगर परिषद व अशोकराव जाधव गटनेते फलटण नगर परिषद यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन उभे करणेत आले होते. त्या आंदोलनास यश मिळून, अमरावतीच्या कंपनीकडील सर्व्हे रद्दपात्र ठरवून, सुनावणी घेवून, बिले कमी करणेचे आश्वासन मुख्याधिकारी साहेब यांनी दिले होते. वास्तविक सुनावणी झाली परंतु त्याचा कोणताही निकाल न देताच नगरपालिकेने फलटणकर नागरिकांना वाढीव रक्कमेची घरपट्टी बिले पाठविली आहेत. तरी फलटण मधील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी मागील जुनी कमी रक्कमेची बिले व आज आलेली वाढीव रक्कमेची बिले यांची झेरॉक्स काढून आमचेकडे जमा करावीत. वाढीव रक्कमेची बिले कमी होत नाहीत तोपर्यंत कोणीही घरपट्टी भरु नये.
तसेच गेली १० महिने झाले कोविड-१९ मुळे शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिक हे रोजगारविना घरी बसून आहेत. दुकाने व रोजगार बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत, तशातच फलटण नगर पालिकेने वाढीव घरपट्टीची बिले देवून फलटणकर नागरिकांवर अन्यायच केलेला आहे. तरी वाढीव आलेली घरपट्टी कमी करुन त्याची बिलाची रक्कम निश्चित करुन करोना काळात विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निश्चित झालेल्या धरपट्टीच्या ५०% रक्कमच घरपट्टी म्हणून आकारण्यात यावी, अन्यथा फलटणकर नागरिकांसाठी विरोधी पक्षाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
तरी फलटणमधील नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन नगरपालिकेने ५०% घरपट्टी माफ करावी अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी अधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
No comments