प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
Famous director Nishikant Kamat dies after a long illness
गंधवार्ता वृत्तसेवा (16 ऑगस्ट) - प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील रुग्णालयात निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हॅपेटोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागारांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचं इस्पितळाच्या प्रशासनाकडून आधी सांगण्यात आलं होतं. पण निशिकांत यांना झालेल्या आजारवर कोणतेही उपचार नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती.
मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या निशिकांत यांनी कमी वेळातच हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवला होता. 'दृश्यम', 'मुंबई मेरी जान', 'मदारी', 'फोर्स' हे त्यांचे चित्रपट हिट ठरले. 2015 मध्ये आलेल्या दृष्यम या चित्रपटाद्वारे त्यांना लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. मराठीतही त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'डोंबिवली फास्ट'सह रितेश देशमुख स्टारर 'लय भारी', स्वप्निल जोशी-सुबोध भावे स्टारर 'फुगे' हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.
दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत यांनी अभिनयातही आपणी चुणूक दाखवली. 'सातच्या आत घरात' (मराठी), 'रॉकी हॅण्डसम', '404 एरर नॉट फाऊंड', 'जुली-2', 'भावेश जोशी' या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. यापैकी 2016 मध्ये आलेल्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. ते अखेरचे हर्षवर्धन कपूर स्टारर भावेश जोशी या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
No comments