शिका, वाचा, जिंका’; कलेतूनही शिवरायांचा विचार जपा!- कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे युवा कलावंतांना आवाहन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.10 :“शिवाजी विद्यापीठाच्या नावातील ‘शि’ म्हणजे शिका, ‘वा’ म्हणजे वाचा आणि ‘जी’ म्हणजे जिंका. हा संदेश विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला क्षेत्रातही आचरणात आणावा,” असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयात ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाची शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही. एन. शिंदे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब होते. प्रमुख उपस्थिमध्ये फलटण बाजार समितीचे चेअरमन मा. रघुनाथराजे नाईक निंबाळकर होते.
या महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कलांमधील सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. समारोपप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या पदवीवर शिवाजी विद्यापीठाचे नाव असणार असल्याने विद्यापीठाच्या नावातून मिळणारा ‘शिका, वाचा, जिंका’ हा संदेश त्यांनी आपल्या कलाप्रवासातही जपावा, शैक्षणिक क्षेत्रात विध्यार्थ्यांना प्रोत्साहन, मान -सन्मान मिळून त्यांची पुढील वाटचाल समृद्ध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालये करत आहेत. मुधोजी महाविद्यालयात झालेला हा महोत्सव अनेक अर्थाने ऐत्यासिक असा आहे, असे सांगितले.
समारोप सोहळ्याची सुरुवात शिवाजी विद्यापीठाच्या कलाकारांनी सादर केलेल्या लोकवाद्यवृंदाच्या दमदार सादरीकरणाने झाली. विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या कलाविष्काराने उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर इचलकरंजी येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘डोले कुणी ते’ हे लोकनृत्य सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.
मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम यांनी प्रास्ताविकातून ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या विविध स्पर्धांचा आढावा घेतला. महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी शिवाजी विद्यापीठातील कलाकार किरण भाजीभाकरे आणि आदित्य घाडशी यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची पेन्सिल स्केचेस साकारून त्यांना भेट दिली. कलाकारांच्या या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने समारंभात विशेष आकर्षण निर्माण केले. स्पर्धक संपदा जगताप आणि संघ व्यवस्थापक आरिफ महात यांनीही मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे यांनी महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. व्ही. गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समारंभाचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी युवा कलाकारांनी आपल्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करावे आणि आधुनिक सर्जनशीलतेच्या माध्यमातून त्या जगासमोर प्रभावीपणे मांडाव्यात, असे आवाहन केले. परंपरेचा अभिमान आणि नव्या विचारांची जोड यांमधून कला अधिक समृद्ध होते, हा विचार त्यांनी मांडला.
यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. व्ही. गुरव, प्रा. डॉ. एस. जी. घाणे, प्रा. डॉ. बी. एस. सातपुते, प्राचार्य डॉ. जाधव, विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. सुरेखा अडके, कोल्हापूर जिल्हा समन्वयक आर. एच. अत्रिग्रे, सातारा जिल्हा समन्वयक डॉ. देवानंद सोनटक्के, युवा महोत्सव समितीचे सदस्य, मध्यवर्ती युवा महोत्सव समन्वयक डॉ. टी.पी. शिंदे, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, संस्थेचे पदाधिकारी आणि दैनिक ‘ऐक्य’चे ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता उपस्थित होते. कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रा. डॉ. पी. डी. बच्छाव यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संग्राम निंबाळकर व प्रा. निलम देशमुख यांनी केले, तर युवा महोत्सवाचे समन्वयक व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वळेकर यांनी आभार मानले.
विजेत्या महाविद्यालयांची उल्लेखनीय कामगिरी
- विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर : वैयक्तिक व समूह गटातील सर्वसाधारण विजेतेपद; संगीत, नाट्य व नृत्य विभागांतील शताब्दी महोत्सव चषक आणि लोककला फिरता चषक.
- सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड : कला विभागातील शताब्दी महोत्सव चषक, वैयक्तिक गटात उपविजेतेपद; सातारा जिल्ह्यात वैयक्तिक व समूह गटांत विजेतेपद.
- शाहूजी लॉ कॉलेज, कोल्हापूर : साहित्य विभागातील शताब्दी महोत्सव चषक, समूह गटात उपविजेतेपद आणि कोल्हापूर जिल्ह्यात वैयक्तिक गटात विजेतेपद.
- धनंजयराव कदम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी : लोकनृत्याचा फिरता चषक.
- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज : सांगली जिल्ह्यात वैयक्तिक गटात विजेतेपद.
- श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मिरज : सांगली जिल्ह्यात समूह गटात विजेतेपद.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि विविध कलाप्रकारांमधील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव फलटणच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली मुधोजी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि आयोजन समितीने महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments