Breaking News

मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य यु. आर. खाडे सर यांचे निधन; विद्यार्थीप्रिय शिक्षक काळाच्या पडद्याआड; माजी विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Former Principal of Mudhoji High School U. R. Khade Sir passes away; Student-loving teacher passes away; Emotional tributes from alumni and dignitaries in the education sector

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १५ : मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य, गणित विषयाचे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक उद्धव रामचंद्र (यु. आर.) खाडे सर (वय ८२, मूळ रा. म्हसवड) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील निष्ठावंत, शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, फलटण आणि म्हसवड परिसरात शोककळा पसरली आहे.

गणित विषय सोपा करून शिकवणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक

    मूळचे म्हसवड येथील रहिवासी असलेल्या खाडे सरांनी प्राथमिक शिक्षण म्हसवड येथे, तर माध्यमिक व उच्च शिक्षण मुधोजी हायस्कूल आणि मुधोजी कॉलेज, फलटण येथे पूर्ण केले. शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी म्हसवड येथून आपल्या नोकरीची सुरुवात केली.

    गणित आणि भूमितीसारखे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय सोप्या, रंजक आणि प्रभावी पद्धतीने शिकवण्याची त्यांची हातोटी होती. विषयातील सखोल ज्ञान, शिकवण्याची अनोखी शैली आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे त्यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिक मिळवला.
प्राचार्यपदाच्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान

    खाडे सरांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये उपप्राचार्य म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. त्यानंतर १९९५ ते २००२ या कालावधीत त्यांनी मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.

    आपल्या प्रशासकीय कार्यकाळात त्यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवताना त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठीही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा मुधोजी शैक्षणिक परिवारावर उमटला आहे.

लाडक्या सरांना अश्रुपूर्ण निरोप

    खाडे सरांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी पुण्याहून विद्यानगर, फलटण येथे आणण्यात आले. त्यानंतर फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या सरांना अखेरचा निरोप देताना अनेकांना भावना अनावर झाल्या.

    मुधोजी परिवार, फलटण एज्युकेशन सोसायटी, माजी विद्यार्थी तसेच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी खाडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी देणारे आणि शिस्तीचे संस्कार रुजवणारे खाडे सर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

No comments