Breaking News

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६९ वी जयंती फलटणमध्ये उत्साहात साजरी

The 369th birth anniversary of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj was celebrated with enthusiasm in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक फलटण येथील आजोळी विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दुग्धभिषेक व पंचोपचार पूजन करून जयंती उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.
    यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवभक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मोठ्या संख्येने शिवप्रेमी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
    फलटण हे धर्मवीर संभाजी महाराजांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे दरवर्षी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही धार्मिक विधी, पूजन व शिवगर्जनेत जयंतीला दिमाखदार सुरुवात झाली.
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, फलटण यांच्या वतीने जयंतीच्या पूर्वसंध्येला “दुग्ध अभिषेक सोहळा” आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते हा अभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी फलटण शहरातील शिवप्रेमी व शंभुप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन केले.
    कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि धर्मरक्षणाच्या कार्याचे स्मरण करत युवकांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. “छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि हिंदवी स्वराज्यासाठीचे योगदान हे प्रेरणादायी असून पुढील पिढीपर्यंत इतिहास पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे,” असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

No comments