Breaking News

फलटण दहिवडी रस्ता कामात शेतकऱ्यांवर अन्याय - श्रीमंत रामराजे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Injustice against farmers in Phaltan-Dahiwadi road work - Shrimant Ramraje met the District Collector

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ ऑगस्ट २०२५ - फलटण दहिवडी मार्गावर सुरू असलेले रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू असून, हा शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तसेच याबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटणार असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.

    फलटण दहिवडी मार्गावरील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याचे काम चालू केले असून, त्यासाठी कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असून संबंधित विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांना योग्य मोबदला देणे गरजेचे असताना याबाबत अधिकारी व संबंधित विभाग शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देत नाही, त्यामुळे कोळकी ते दुधेभावी या मार्गावरील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे काही दिवसापूर्वी गाऱ्हाणे सांगितले होते, याबाबत मी लवकरच तुम्हाला न्याय देण्यासाठी पुढे येईल असा शब्द संबंधित शेतकऱ्यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला होता, त्या अनुषंगाने आज विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांसह भेट घेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली व याबाबत त्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे सांगितले. 

    तसेच मी स्वतः याबाबत लवकरच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments