Breaking News

जोशी हॉस्पिटल आयोजित 'आपली फलटण मॅरेथोन २०२३' स्पर्धा दि. १५ ऑक्टोबर रोजी

Joshi Hospital organized 'Apali Phaltan Marathon 2023' competition on 15th October

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १८ -जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटण च्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन रविवार दि. १५ आक्टोंबर  रोजी सकाळी ६  वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

    जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हास्पिटल  गेल्या ७ वर्षापासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे. कोरोना महामारी मुळे मधील दोन वर्षे कुठलेच कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यामुळे या वर्षी अधिक जोमाने हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूयात असे डॉ प्रसाद जोशी यांनी आवाहन केले आहे .

   मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले. 

          २५ ते ७५ वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व  प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्या २३ वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे.  सदरचे पेशंट  आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि. १५ आक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सार्वांना केले आहे.

दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६  वाजता सजाई गार्डन फलटण येथून १५ कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे.  सकाळी ६. ३0 वाजता सजाई गार्डन येथून १० कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सकाळी ७ वाजता ५ कि. मी. मॅरेथॉनची स्पर्धा सुरू होणार आहे. सकाळी ७.३० वाजता किमी ची ज्येष्ठांसाठीची वाकेथान सुरू होणार आहे . सकाळी ८ वाजता रोबोटिक्स तंत्रज्ञानाची केलेल्या पहिल्या ५० पेशंटची अनोखी १.५ किमीची चालण्याची परेड आपल्याला पाहायला मिळणार आहे . मॅरेथॉन पूर्ण केल्यावर प्रत्येकाला एक फिनिशर मेडल मिळणार आहे . त्यानंतर भरपेट नाष्ट्याची सोय केली आहे. १०.३० वाजता मुख्य कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप केले जाईल. सजाई गार्डन  कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी दि. ३० सप्टेंबर पर्यंत आनलाईन नोंदणी joshihospitalpvtltd.com  या वेब साईट वर करता येणार आहे . प्रवेश शुल्क ५००/- फक्त आहे जे की ऑनलाईन पे करायचे आहे.    ३ किमी मध्ये भाग घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही फी आकारली जाणार  नसल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.

१२, १३ आणि १४ ऑक्टोबर या तीनही तारखेला सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत  मॅरेथॉनचे किट घेऊन जावे, ज्यामध्ये टीशर्ट, रणार बिब , टोपी आणि एक आकर्षक गिफ्ट असेल.  तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीजास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा ली, फलटण तर्फे करण्यात आले आहे .

No comments