Breaking News

कोळकी येथे जमीन खरेदी प्रकरणी फसवणूक ; २६ लाख २० हजार रुपयांचा घातला गंडा

Fraud of Rs 26 lakh 20 thousand in land purchase case at Kolaki

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ एप्रिल - कोळकी ता. फलटण येथील ४.५ गुंठे  जमीन खरेदी करून देतो असे सांगून, विश्वास संपादन केला, नंतर वेगवेगळी कारणे सांगून जमीन खरेदी करण्यासाठी  एकूण २६ लाख २०० हजार  रुपये स्विकारून,  जमीन खरेदी करून दिली नाही व पैसेही परत करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी शिंगणापूर येथील दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिजीत जरिचंद सुरवसे  रा. नरसोबानगर, कोळकी ता.फलटण यांचे वडील रिटायर झाल्यानंतर त्यांना कोळकी येथे घर बांधण्यासाठी जमीन हवी होती,  त्यानुसार  बापू नामदेव शिंगाडे यांनी कोळकी येथील जमीन सर्वे नं ५७/४ मधील ९ गुंठे जमीन दाखवली,  परंतु  सुरवसे यांना एवढी जास्त जमीन नको होती. त्यामुळे शिंगाडे व सुरवसे यांच्यात  साडेचार - साडेचार गुंठे जमीन खरेदी करायचे असे ठरले.

    त्यानुसार फिर्यादी अभिजीत सुरवसे यांनी स्वतःच्या खात्यातून तसेच भाऊ मनोज यांच्या खात्यातून बापू नामदेव शिंगाडे यांनी मागणी केल्यानुसार जमीन खरेदी करण्यासाठी बापू शिंगाडे यांच्या खात्यात तसेच रोख असे एकूण १६ लाख २० हजार रुपये दिले. सदर जमीनीचा साठे करार सुरवसे व शिंगाडे यांच्या नावे करण्याचे ठरलेले असतांनाही शिंगाडे यांनी एकूण ९ गुंठे जमिनीचा साठेकरार  स्वतःच्या व पत्नीच्या  नावे करून घेतला. ही बाब सुरवसे यांना नंतर समजली. याबाबत शिंगाडे यांना  विचारणा केली असता, तुम्हाला तुमचे ४.५ गुंठे जमीनीचा साठेकरार करून देतो, असे सुरवसे यांना शिंगाडे यांनी सांगितले. त्यानंतर सुरवसे यांनी शिंगाडे यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर जमिनीचे  साठेखत शिंगाडे यांनी करून दिले नाही.

    सन २०२१ मध्ये बापू शिंगाडे यांनी खरेदी करीत असलेल्या जमीनीस रस्ता नाही असे सुरवसे यांना सांगितले व  रस्ता देण्यासाठी शेजारील शेतकरी शंकर दत्तोबा पखाले हे तयार आहेत, तरी जमीनीस रस्ता मिळाल्यास  जमीन एन.ए.  होईल व त्यानंतर जमीनीचा व्यवहार करता येईल असे सांगितले.  रस्ता देण्यासाठी शंकर पखाले यांनी १० लाख रूपयाची मागणी केली.  सुरवसे पैसे देण्यास तयार न्हवते. मात्र बापू शिंगाडे यांनी सदर रस्त्याकरीता १० लाख रूपये दया,  जमीन एन.ए करून दस्त करून देतो असे सांगितल्याने, अभिजित सुरवसे यांचे वडील जरिचंद सुरवसे यांनी त्यांच्या  अकाऊंटचा  १० लाख रुपये रकमेचा चेक  बापू शिंगाडे यांच्या सांगण्यावरून त्यांची पत्नी नामे रूपाली बापू शिंगाडे यांच्या नावे दिला. त्यानंतरही बापू शिंगाडे यांनी वेगवेगऴी कारणे सांगून तसेच गुंठेवारी पद्धत बंद झाल्यामुऴे जमीन एन.ए. होत नाही व खरेदी व्यवहार करता येणार नाही असे सांगितले. शेवटी सुरवसे यांनी जमीन खरेदी व्यवहाराकरीता वेऴोवेऴी दिलेले एकूण २६ लाख २० हजार रूपये परत करण्यास शिंगाडे यांना सांगितले. त्यावेऴी बापू शिंगाडे पैसे परत देतो म्हणाले. मात्र पैसे देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. 

     अश्या प्रकारे बापू नामदेव शिंगाडे रा शिंगणापूर ता. माण जि सातारा व त्यांची पत्नी रूपाली शिंगाडे यांनी कोळकी येथील जमीन सर्वे नं ५७/४ मधील  ४.५ गुंठे जमीन खरेदी करून देतो असे सांगून विश्वास संपादन केला व जमीन खरेदी करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून, एकूण सुमारे २६ लाख २० हजार रुपये रक्कम जमीन खरेदीकरीता स्विकारून अदयाप उपरोक्त जमीन खरेदी करून देण्यास व पैसे परत करण्यास टाऴाटाऴ करून फसवणूक केली असल्याची फिर्याद अभिजीत जरिचंद सुरवसे  रा. नरसोबानगर, कोळकी ता.फलटण यांनी दिली आहे.

No comments