कमिन्स कंपनीत १ कोटी ६० लाख रुपयांच्या इंधन इंजेक्टरची चोरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ मार्च - सुरवडी ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व अँसेम्बली विभागामध्ये ठिकठिकाणी ठेवलेले १ कोटी ६० लाख ५७ हजार ३५ रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेले आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १ एप्रिल २०१९ ते दि.४ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने टाटा कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा या कंपनीमधील वेअर हाऊस व अँसेम्बली विभागामध्ये ठिकठिकाणी ठेवलेले १ कोटी ६० लाख ५७ हजार ३५ रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरुन नेले आहेत. यामध्ये १) बॉश (Bosch) कंपनीचे, ५२९५०६०या मॉडेलचे १०३२ नग २) कमिन्स कमिन्स ४३८४६१९ या मॉडेलचे ६२८ नग 3) कमिन्स कमिन्स ४३८४७८६ या मॉडेलचे ५८६ नग ४) बॉश (Bosch) कंपनीचे ५३०६०५० या मॉडेलचे ३२५ नग असे एकूण २५५७ इंधन इंजेक्टर चोरीस गेले आहेत.
टाटा कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुरवडी, ता. फलटण ही जागतिक कंपनी असून, सुरवडी येथील प्लांट खुप मोठा आहे. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पहिल्यांदा मटेरियल विभागाने सविस्तर तपासणी करुन चोरीच्या मालाबाबत शहानिशा केली. त्यांनतर कंपनीच्या फायनान्स विभागाने स्वतंत्र ऑडीट केले. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दि. १५ मार्च रोजी तक्रार देण्यात आली असल्याची फिर्याद गुरप्रीत बकशिश भुल्लर, जनरल मॅनेजर यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.
No comments