प्रांत शिवाजीराव जगताप यांना केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ लेखनी बंद आंदोलन
समिर यादव यांना निवेदन देताना नीलेश भोसले, लक्ष्मण अहिवळे, दत्तात्रय सरक, संजिवनी सावंत, एन, डी. काळे व अन्य |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ डिसेंबर - प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांना वाळू माफियाने केलेल्या धक्काबुक्कीचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा येथील महसूल कर्मचार्यांनी आज तीव्र निषेध करुन लेखनी बंद आंदोलन केले. तसेच फलटण तालुका महसुल कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसिलदार समिर यादव यांना निषेधाचे निवेदनही देण्यात आले.
गुरुवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास फलटण तालुका अनाधिकृत गौणखनिज प्रतिबंधक पथकाने एक वाळूचे वाहन अनधिकृतपणे वाळू वाहतूक करत असताना ताब्यात घेऊन शहर पोलिस स्टेशन येथे जमा करण्यासाठी चालवले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना वाळूमाफियाने गिरवीनाका परिसरामध्ये धक्काबुक्की करून व जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याचा प्रकार घडला आहे. दस्तुरखुद प्रांत अधिकारी यांच्यावर अशाप्रकारे वाईट प्रसंग येत असेल तर सर्वसामान्य कोतवाल, पोलीस पाटील,तलाठी, मंडलाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर देखील ही वेळ येऊ शकते, किंवा बरेच वेळा आलेली देखील असते परंतु आपण कधीही त्याची वाच्छता करत नाही. वाळू माफियांचा त्रास व दहशत अलीकडील काळात अधिक वाढत चालल्याने महसूल प्रशासनाचे कर्मचारी, अधिकारी मोठ्या ताण-तणावमध्ये काम करत आहेत.
फलटण उपविभागाचे आपले महसूल कुटुंबप्रमुख प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याबाबतीत घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. अशा अघटित घटना पुन्हा घडू नयेत व भविष्यात शासकीय अधिकारी- कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत असताना कोणी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे व वाळू माफियांविरोधात आवाज उठवला पाहिजे. या अनुषंगाने आज शुक्रवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी आपण एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन करून सदर घटनेच्या निषेधार्थ तहसिलदार समिर यादवयांना निवेदन देण्यात आले. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर सेतुसह महसुल कार्यालयातील कामकाज ठप्प होते.
निवेदन देतेवेळी फलटण तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश भोसले, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय सरक, निवासी नायब तहसीलदार संजिवनी सावंत, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार जाधव आदींसह माहसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
No comments