Breaking News

सामुदायिक कोल्डस्टोरेज हा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Community Cold Storage is a Pilot Project for Farmers in the Taluka - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क, आयआयएआर, मेटॅलेक्स व गोविंद फौंडेशन, कुरोली फुड्सच्या माध्यमातून  मिरगाव ता. फलटण येथे उभे राहत असलेल्या कोल्ड स्टोरेजचा उपक्रम शेतकऱ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट उभा राहिल्यानंतर अनेक शेतकरी त्याचे अनुकरण करून तालुक्यात इतर ठिकाणी कोल्ड स्टोरेजची उभारणी करू शकतात.  हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून यामध्ये कोणताही आर्थिक फायदा न घेता कमीतकमी दरामध्ये शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची सुविधा पुरवली जाणार आहे, याच धर्तीवर  तालुक्यात इतर ठिकाणीही आपल्याला कोल्ड स्टोरेजची उभारणी करता येणार आहे, तालुक्यात तालुक्यात पाणी आलेले आहे आणि शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे न वळता  फळ पीक घ्यावे, या श्रीमंत रामराजे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, आता  तालुक्‍यातील शेतकरी फळ पिकाकडे वळून, सक्षम होत आहेत. त्यामुळे भविष्यात कोल्डस्टोरेज ची कमतरता भासणार आहे.  त्यामुळे तासगावमध्ये जशी ठिकठिकाणी कोल्ड स्टोरेज आहेत, त्या प्रकारे आपल्या तालुक्यात कोल्ड स्टोरेजची निर्मिती करावी असे आवाहन गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टसचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    फलटण तालुक्यातील मिरगाव येथे नांदल फाटा  येथे रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क, आयआयएआर, मेटॅलेक्स व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून सामुदायिक शीतगृहाचा  (Community Cold Storage ) भूमिपूजन समारंभ बुधवार दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कचे अध्यक्ष रत्नाकर शेट्टी, आयआयएआरचे कार्यकारी अधिकारी समीर शहा, रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कचे अध्यक्ष रत्नाकर शेट्टी, रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कचे माजी अध्यक्ष हॅरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    धोम-बलकवडीचा कॅनल या भागात आला नव्हता, त्या अगोदर 1982 साली आप्पासाहेब चाफळकर यांच्या पुढाकाराने रोटरी असोसिएशनच्या माध्यमातून तरडगाव येथे पाणी उपसा सिंचन करण्यात आली होती, व हजारो शेतकऱ्यांचा संसार उभा करण्यात हातभार लावला होता, त्याचबरोबर पोलिओ सारख्या रोगाचा संपूर्णपणे नायनाट आपल्या देशात किंबहुना जगामध्ये केला, याच्या पाठीमागे जी ताकद होती ती रोटरीची ताकद होती.  पोलिओ योजनेमध्ये सिंहाचा वाटा रोटरीचा होता. अशाप्रकारे काम करणारी रोटरी ही एक मोठी सामाजिक संस्था असल्याचे गौरवोद्गार श्रीमंत संजीवराजे यांनी काढले. 

     रोटरीच्या माध्यमातून आपल्या फलटण तालुक्यात कोल्डस्टोरेज उभे करण्यात येत आहे, शेतीमाल टिकवायचा असेल तर कोल्डस्टोरेज ची गरज वाढली आहे. आपल्या भागात कोल्डस्टोरेजची लागणारी गरज ओळखून, रोटरीने पुढाकार घेऊन, ही गरज भरून काढली आहे.  याचा नक्कीच फायदा हा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल व शेतकरी सुद्धा याचा फायदा करून घेतील. कोल्ड स्टोरेज मुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोल्डस्टोरेज उभारण्यात आयआयएआर ही अत्यंत मोठी संस्था कार्यरत आहे.जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान iiar कडे अवगत आहे, त्यामुळे मिरगाव येथे होणारे कोल्डस्टोरेज हे चांगल्या प्रतीचे, चांगल्या दर्जाचे उभे राहील असा विश्वास मला वाटतो.  गोविंद फाउंडेशन व कुरोली फुड्सच्या, रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क, आयआयएआर, मेटॅलेक्स यांच्या माध्यमातून  उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेज मध्ये ना नफा ना तोटा या तत्वानुसार शेतकऱ्यांकडून कमीत कमी दर घेऊन, कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले.

    रोटरी क्लब हा २५६ देशांमध्ये कार्यरत आहे. रोटरी क्लब विविध क्षेत्रामध्ये आपले काम करीत असतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कृषी, जलसिंचन, शिक्षण व पर्यावरण या क्षेत्रामध्ये रोटरी क्लब कार्यरत आहे. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज हा प्रकल्प साकारत आहे. फलटणमध्ये सुरु झालेल्या रेल्वेमुळे शेतकऱ्यांना आपले माल हे कमी खर्चात पुण्यामुंबई मध्ये जावू शकतात. त्यांना रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी बांधव हे आपला माल हा कोल्ड स्टोरेज मध्ये साठवणूक करून ठेवू शकतात, असे मत रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा यांनी व्यक्त केले.

    रोटरी क्लब, आयआयएआर, मेटॅलेक्स व गोविंद फौडेशनच्या माध्यमातून उभे राहत असलेले कोल्ड स्टोरेज ही फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची खरी गरज होती. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची खरी गरज ओळखूनच फलटण तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेज हा प्रकल्प सुरु केलेला आहे. कोल्ड स्टोरेज मुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल हा वाया जाणार नाही. तालुक्यामध्ये आधुनिक शेती करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची आवश्यकता होतीच. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे फलटण तालुका हा दुष्काळी तालुका राहिला नाही. धोम - बलकवडी या प्रक्लपामुळे फलटण तालुक्याची दुष्काळी तालुका म्हणून असेलेली ओळख पुसली गेलेली आहे, असे मत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

    फलटण तालुक्यातील कोल्ड स्टोरेज हा उपक्रम स्तुत्य आहे. भाजीपाल्याचे फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फलटणला सुरु होत असलेले कोल्ड स्टोरेज हे अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. रोटरी क्लबने फलटण येथे कोल्ड स्टोरेज उभारण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. रोटरी क्लबने फलटणची केलेली निवड हि कधीही फलटणकर चुकू देणार नाहीत. फलटण तालुक्यामध्ये विविध उपक्रमशील शेतकरी आहेत. सदरील कोल्ड स्टोरेजचा फायदा हा नक्कीच उपक्रमशील शेतकऱ्यांना होईल. फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोड धंदा म्हणून आपल्या शेतामध्ये शेततळे उभारून त्या ठिकाणी मत्सशेती करावी. त्या साठी जिल्हा कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी यावेळेस दिली. 

    फलटण येथे रोटरी क्लब, आयआयएआर मेटॅलेक्स व गोविंद फौंडेशनच्या माध्यमातून सुमारे एक हजार मे. टन कॅपेसिटी असणारे कोल्ड स्टोरेज उभे राहणार आहे. सदरील कोल्ड स्टोरेजचे मजबूत पिलर म्हणून रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौडेशन हे कामकाज करणार आहेत. सदरील कोल्ड स्टोरेज मध्ये चार विभाग असणार आहेत. त्यापैकी दोन हे ५०० मे. टन कॅपेसिटी असणारे तर दोन हे १५० मे. टन कॅपेसिटी असणारे असे विभाग राहणार आहेत. फलटण तालुक्यातील भाजीपाला, फळे, फुले व शेतमाल यांस योग्य तो रास्त भाव मिळेपर्यंत आपला शेतमाल हा साठवणूक करून ठेवता येणार आहे. याचा नक्कीच फायदा फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल, असे मत आयआयएआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर शहा यांनी यावेळेस व्यक्त केले. 

    रोटरी क्लब हि सामाजिक संस्था असून २५६ देशांमध्ये कार्यरत असणारी सदरील संस्था आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम हे सातत्याने राबिविले जात असतात. फलटण येथे रोटरी क्लब, आयआयएआर व गोविंद फौडेशनच्या माध्यमातून उभे राहत असलेले कोल्ड स्टोरेज हे खासकरून शेतकरी वर्गासाठी फायदेशीर ठरणार आहे. तरी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदरील कोल्ड स्टोरेजचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे मत रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्कचे अध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

    फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने चौधरवाडी येथील मुकुंद धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास फलटण तालुक्यातील विविध पदाधिकारी, शेतकरी व उद्योजक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हे सौ. राजश्री शिंदे यांनी केले तर आभार गोविंद मिल्कचे व्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी मानले.

No comments