Breaking News

पालखी मार्ग मोकळा करण्यासाठी नगर परिषदेची धडक कारवाई ; अतिक्रमणांवर बुलडोझर

Municipal Council takes drastic action to clear the path for the palanquin; Bulldozers on encroachments

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासह शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फलटण नगर परिषदेने धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे रस्ते अधिक प्रशस्त होत असून वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळत असल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

    आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी फलटण शहरात येत असल्याने पालखी मार्गावरील गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन महत्त्वाचे ठरते. याच अनुषंगाने नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली आहे.

    मलटण भागापासून मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली. अनेक व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले. काही अतिक्रमणधारकांनी साहित्य हलविण्यासाठी मुदत मागितल्याने प्रशासन समन्वय साधत टप्प्याटप्प्याने कारवाई करत आहे.
नगर परिषदेने या मोहिमेसाठी एकाच वेळी तीन ते चार स्वतंत्र पथके कार्यरत केली आहेत. पालखी मार्गावरील अनधिकृत शेड, फलक, हातगाडे तसेच रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. परिणामी अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढून पादचारी आणि वाहनधारकांना दिलासा मिळत आहे.

    मलटणमधील श्रीराम बाजार परिसरासह काही ठिकाणी पालखी मार्ग अरुंद होत असल्याने तेथील अतिक्रमणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतर मार्ग अधिक सुकर होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान, केवळ पालखी मार्गापुरतीच ही मोहीम मर्यादित न ठेवता शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणेही हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी अतिक्रमणमुक्त रस्ते ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

    एकंदरीत, पालखी मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहराला मोकळा श्वास मिळण्यास सुरुवात झाली असून वारकरी, नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

    पुनर्वसनालाही प्राधान्य - नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर
अतिक्रमण हटविण्याबरोबरच प्रभावित होणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचाही नगर परिषद सकारात्मक विचार करत आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या गाळ्यांमधून आणि उपलब्ध जागांमधून पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. शहराचा विकास, वारकऱ्यांची सुविधा आणि सर्वसामान्यांच्या उपजीविकेचा समतोल राखत अतिक्रमणमुक्त फलटण घडविण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments