ग्रामपंचयत निवडणूकीत राजे गटाचे वर्चस्व; खासदार गटाचाही काही ग्रामपंचायतीवर झेंडा
![]() |
| ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांची भेट घेतली |
Dominance of Raje group in Gram Panchayat elections ;The MP group also has flags on some gram panchayats
फलटण- : फलटण तालुक्यात चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने देखील काही ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. राजे गटाने ७० हुन अधिक ग्रामपंचायत जिंकल्याचा दावा केला आहे, तर खासदार गटाने १४ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.
![]() |
| ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली |
फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पडल्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अंतीम दिवसापर्यंत ६ ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध पार पडल्या त्या सर्व राजे गटाच्या आहेत, त्याशिवाय १३८ सदस्य विविध ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत. येथील शासकीय धान्य गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. गोदाम परिसराला अक्षरशः यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते, मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतराचे नियम विसरुन उमेदवार, त्यांचे समर्थक, विविध राजकीय पक्ष, गट तटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. हजारो कार्यकर्ते निकालाच्या उत्सुकतेसाठी गोळा झाले होते, मोठा पोलीस बंदोबस्तही नेमण्यात आला होता.
बहुचर्चित कोळकी ग्रामपंचायत निकाल सर्वप्रथम बाहेर आला कोळकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते, यामध्ये अपेक्षेप्रमाणे राजेगटाने १७ पैकी १२ जागा जिंकल्या ४ ठिकाणी राजे गटाचे बंडखोर निवडून आले असून भाजपला येथे भोपळाही फोडता आला नाही. राजे गटाने प्रतिष्ठतेच्या केलेल्या तुषार नाईक निंबाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलचे सर्व उमेदवार पराभूत झाले.
![]() |
| कोळकी ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवार व दत्तोपंत शिंदे यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली |
भाजपचे तुकाराम शिंदे यांनी वाखरी ग्रामपंचायत मध्ये भाजपचा झेंडा रोवत ग्रामपंचायत राजे गटाकडून ताब्यात घेतली आहे. आणखी एक बहुचर्चित निंभोरे ग्रामपंचायतीमध्ये राजे गटाने सत्ता परिवर्तन करुन खासदार गटाला धक्का देत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद रणवरे यांनी निंभोरेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली आहे, ते स्वतः विजयी झाले आहेत. साखरवाडी ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी अनेक नाट्यमय घडामोडी घडविल्या असून विद्यमान सरपंच विक्रम भोसले यांनी राजे गटाशी बंडखोरी करीत स्वतःचे पॅनेल उभे केले होते त्यांच्या पॅनेलला १७ पैकी ८ जागा मिळाल्या असून ते स्वतः दोन जागेवर विजयी झाले आहेत. राजे गटाला ७ जागा तर प्रल्हादराव पाटील गटाला २ जागा मिळाल्या आहेत. येथे प्रल्हादराव पाटील गट किंग मेकरच्या भूमिकेत राहणार आहे.
![]() |
| निंभोरे ग्रामपंचायत निकालानंतर आनंद व्यक्त करताना मुकुंदराव रणवरे (काका) |
सरडे येथे परिवर्तन करीत राजे गटाने पुन्हा एक हाती सत्ता ताब्यात घेतली आहे, राजाळे ग्रामपंचायतीमध्ये निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी परिवर्तन घडवून राजे गटाचा पराभव करीत १३ पैकी ११ जागा आपल्या गटाच्या ताब्यात घेतल्या आहेत, निंबळक ग्रामपंचायत उद्योजक राम निंबाळकर यांनी चौथ्यांदा आपल्या ताब्यात ठेवली आहे, त्यांना १३ पैकी ८ जागा मिळाल्या आहेत राजे गटाने ५ जागा जिंकल्या आहेत. फरांदवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन खासदार गटाची सरशी झाली आहे. टाकळवाडे ग्रामपंचायती मध्ये सत्ता परिवर्तन होऊन
![]() |
| राजाळे ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवार व निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली |
राजे गटाची सत्ता आली आहे, मुळीकवाडी येथे शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला आहे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव हे गुणवरे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले असून तेथे राजे गटाने बहुमत मिळविले आहे.
काही ग्रामपंचायतीमध्ये राजे गट अंतर्गत लढती झाल्या ढवळ येथे राजेगट अंतर्गत दोन गटातच लढत होऊन प्रस्थापितांना जनतेने घरी बसवीत राजेगटातीलच नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे. कोळकी आणि सासकल येथील दोन उमेदवार समसमान मते पडल्याने चिट्टीवर निवडून आले आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दूरध्वनीद्वारे सर्व विजयी उमेदवार व समर्थक आणि मतदारांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामपंचायत निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या जयव्हीला आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोज व्हीला या बंगल्यावर मोठी गर्दी केली तेथे आ. दिपकरावं चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजभवन बंगल्यावर विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व अड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सर्व विजयी उमेदवार व समर्थकांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






No comments