पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या श्रेयावरून फलटणच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप; रामराजे समर्थकांकडून कागदपत्रे सादर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा), दि. १ ऑगस्ट २०२६ : फलटण पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनानंतर या प्रकल्पाच्या श्रेयावरून तालुक्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या कामासाठी आपण पाठपुरावा केल्याचा दावा केला असताना, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांनी शासकीय कागदपत्रांच्या आधारे हा प्रकल्प रामराजे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मार्गी लागल्याचा दावा केला आहे.
श्रीमंत रामराजे समर्थकांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२० रोजी तत्कालीन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून फलटण पंचायत समितीचे सभापती व कर्मचारी निवासस्थान धोकादायक झाल्याचे निदर्शनास आणले होते. जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्यासाठी तसेच परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती.
यानंतर १९ मार्च २०२१ रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाकडे ३ कोटी १२ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ढोबळ अंदाजपत्रक प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.
त्यानंतर ग्रामविकास विभागाने ४ जानेवारी २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे २ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली.
रामराजे समर्थकांच्या म्हणण्यानुसार, सदर बांधकाम ऐतिहासिक जबरेश्वर मंदिराच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक होती. दिल्लीतील संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक परवानग्या मिळवण्यात रामराजे नाईक निंबाळकर यांची महत्त्वाची भूमिका होती, असा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमाबाबतही रामराजे समर्थकांनी आक्षेप नोंदविला आहे. शासकीय नियमांचे पालन न करता आणि अधिकृत आमंत्रणपत्रिका न छापता उद्घाटन सोहळा पार पडल्याचा आरोप त्यांनी केला असून, दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या बांधकामाच्या श्रेयावरून फलटणच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, या विषयाची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

No comments